Engineering

Engineering

सिव्हिल इंजिनियरिंग: बारावीनंतर करिअरसाठी उत्तम पर्याय

PUBLISH DATE 16th May 2020

सिव्हिल इंजिनिअरिंगला मराठीमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी म्हणतात. ही अभियांत्रिकीची अशी शाखा आहे की ज्यामध्ये विविध क्षेत्रे, नोकऱ्या, कौशल्य आणि लोक समाविष्ट होतात. स्थापत्य अभियांत्रिकी ही यांत्रिकी अभियांत्रिकी (मेकॅनिकल इंजिनिअरिंग), रसायन अभियांत्रिकी (केमिकल इंजिनिअरिंग) आणि विद्युत अभियांत्रिकी (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग) समवेत अभियांत्रिकीच्या इतर सर्व शाखांची मातृशाखा आहे.

  1. तसेच जल संसाधन, सिंचन आणि बांधकाम अभियांत्रिकी या स्थापत्य अभियांत्रिकीच्या शाखांद्वारे अन्न, वस्त्रे आणि निवारा यासारख्या मानवाच्या तिन्ही मूलभूत गरजा पूर्ण होतात. स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये इमारती, पूल, रस्ते, रेल्वे, धरणे आणि सिंचन (डॅम व इरिगेशन) व्यवस्था, घुमट (डोम), चिमणी, मायक्रोवेव्ह टॉवर्स, मास्ट, पाणी आणि सांडपाणी प्रक्रिया संयंत्र (वॉटर व वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट) आदींचा समावेश होतो. पायाभूत प्रकल्पांच्या बांधकामात जगभरातील गुंतवणूकीचा दर खूपच जास्त आहे. तेल आणि वायू (ऑईल अँड गॅस) प्रकल्प, अणु उर्जा (ॲटॉमिक एनर्जी) प्रकल्प, कोळसा आणि पाण्या पासून वीजनिर्मिती या क्षेत्रातील बांधकाम मधील गुंतवणूकदेखील जास्त आहे. म्हणूनच, या संबंधित क्षेत्रात चांगले कौशल्य असलेल्या अभियंत्यांची गरज सध्या वाढत आहे.
  2. याबरोबरच स्ट्रक्चरल डिझाईन करून बांधकाम करणे, प्रकल्प नियोजन करणे, नगर संरचना व बांधकाम करणे, अंदाज व मूल्यांकन (एस्टिमेशन व व्हॅल्युएशन) करणे, पायपिंग डिझाईन करून बांधकाम करणे, धरण व सिंचन व्यवस्थेचे जाळे तयार करणे, भुमार्ग, लोहमार्ग तसेच जलमार्ग यांचे व्यवस्थापन करून बांधकाम करणे, पिण्याचे पाणी व सांडपाणी यांच्यावर उपचार करणे (वॉटर व वेस्ट वॉटर ट्रीटमेंट) व त्याचे व्यवस्थापन करून बांधकाम करणे, जलसंधारण व जल प्रेरित (वॉटर रेसोर्स व हायड्रॉलिक्स) शास्त्र यांचे व्यवस्थापन करणे, भू, भौगोलिक व भूकंप शास्त्र (जिओलॉजी, जिओटेक्निकल व अर्थक्वेक इंजिनिअरिंग) यांचे व्यवस्थापन करणे, सब सी व ऑफशोर इंजिनिअरिंग इत्यादींसाठी ही स्थापत्य अभियंत्याची आवश्यकता असते.
  3. कंत्राटदार (कॉन्ट्रॅक्टरशिप), बांधकाम करून घेणे (बिल्डरशिप), स्थावर मालमत्तेचे नियोजन करणे (रिअल इस्टेट वर्क्स), सनदी अभियंता (चार्टर्ड इंजिनीअर) असेही काही संबंधित व्यवसाय आहेत ज्यामध्ये स्थापत्य अभियंत्याची अत्याधिक मागणी आहे. तसेच, पीडब्ल्यूडी, सिंचन, रेल्वे, गोदी आणि बंदर (डॉक्स आणि हार्बर) आणि विमानतळ (एअरपोर्ट) यांचे बांधकाम अशा सरकारी क्षेत्रात सुद्धा स्थापत्य अभियंत्याची आवश्यकता भासते.  
  4.  हे एक सर्जनशील क्षेत्र आहे ज्यामध्ये विचार (थिंकींग), नियोजन (प्लॅनिंग), डिझाइनिंग आणि वास्तूंच्या रचनांचे वास्तविक बांधकाम समाविष्ट आहे. म्हणून, हे सुरुवातीला मनामध्ये सुरू होते नंतर कागदावर उतरते, साहित्याची गुणवत्ता ठरवून व डिझाईन करून आवश्यक सामुग्रीचे प्रमाण शोधले जाते. एखाद्याचे स्वप्न साकार करण्याकरिता विविध तज्ञ कार्य करतात आणि महत्त्वाचे म्हणजे या सर्व गोष्टी अंतिम वापरकर्त्याच्या निरीक्षणाखाली केल्या जातात व त्यामुळे हे खरोखरच आव्हानात्मक असते. म्हणूनच स्थापत्य अभियांत्रिकी ही अशी शाखा आहे, ज्याला शहरी तसेच ग्रामीण भागातही कायमच मागणी असते.
  5. आता स्थापत्य अभियांत्रिकी शिक्षणाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात बदलत आहे. मेटल फायबर्स, फ्लाय अॅश, कृत्रिम वाळू (आर्टिफिशियल सँड), ऍडमिक्स्चर, सुपर प्लास्टिसाइजर इत्यादी नॅनो आणि अद्ययावत सामग्रीचा वापर, तसेच डिझाईन तत्त्वज्ञानामध्ये होणारी प्रगती आणि या व्यतिरिक्त, आर्टिफिशियल इंटेलिजन्स व इंटरनेट ऑफ थिंग्स यांचा वापर हे नेहमीच स्थापत्य अभियंत्यांना अद्ययावत राहण्यासाठी भाग पडतात.
  6. बांधकामामध्ये त्यांची सद्यस्थिती (प्रेझेंट स्टेटस), शक्ती आणि टिकाऊपणा (स्ट्रेंथ व ड्यूऱ्याबिलिटी) हा तांत्रिक दृष्टिकोनातून जाणून घेण्यासाठी अत्यंत संवेदनशील इलेक्ट्रॉनिक सेन्सरचा उपयोग करणे हे एक आव्हानात्मक क्षेत्र आहे. 
  7. अभियांत्रिकी शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना किमान तीन महिन्यांचा व्यवहारिक अनुभव (इंटर्नशिप) मिळण्यासाठी अभ्यासक्रमात बदल करावा. तसेच निवड आधारित शिक्षण (चॉइस बेस्ड एज्युकेशन) शिकण्याची प्रक्रिया, प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग, औद्योगिक क्षेत्राने सुचवलेले व्यावसायिक (प्रोफेशनल) व व खुले (ओपन) वैकल्पिक विषय (इलेक्टीव्ह्ज), वेब बेस्ड कोर्सेस, प्रयोग शाळेतील प्रशिक्षण, सॉफ्टवेअर प्रशिक्षण, शांतता अभ्यासक्रमांचा समावेश, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग आणि विविध स्पर्धा इत्यादी व्यवसायिक नोकऱ्या तसेच तंत्रज्ञानाची आव्हाने या दोन्ही मागण्या साठी तयार राहण्यास मदत करतील.

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा