11th Admissions 2025-26

11th Admissions 2025-26

अकरावी प्रवेशाची दुसरी नियमित गुणवत्ता यादी ३ जुलैला होणार जाहीर

PUBLISH DATE 27th June 2023

पुणे - इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील दुसरी नियमित फेरी जाहीर झाली आहे. या फेरीतंर्गत विद्यार्थ्यांना मंगळवारपासून (ता.२७) ते गुरुवारपर्यंत (ता. २९) पसंतीक्रम नोंदविता येणार आहे. दुसऱ्या प्रवेश फेरीची निवड यादी येत्या सोमवारी (ता.३) जाहीर होणार आहे.अकरावीच्या ‘कॅप’ फेरीतंर्गत प्रवेशासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील कनिष्ठ महाविद्यालयात ८८ हजार ६०४ जागा उपलब्ध आहेत. पहिल्या फेरीत ४२ हजार २३९ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालये मिळाली होती, त्यातील २३ हजार ४१५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी सोमवारपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर आता माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने प्रवेशाची दुसरी फेरी जाहीर केली आहे.

प्रवेशाच्या दुसरी नियमित फेरीचे वेळापत्रक :

कार्यवाहीचा तपशील : कालावधी

- प्रवेशासाठी पसंतीक्रम नोंदविणे, अर्जाचा भाग दोन ऑनलाइन सादर करणे, नवीन विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी करून अर्ज प्रमाणित करून घेणे : २७ ते २९ जून

- डेटा प्रोसेसिंग, पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करणे : ३० जून ते २ जुलै

- विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालय निवड यादी प्रदर्शित करणे, विद्यार्थी लॉगिनमध्ये त्याला प्रवेशासाठी मिळालेले कनिष्ठ महाविद्यालय दर्शविणे, दुसऱ्या नियमित फेरीचा कट-ऑफ पोर्टलवर दर्शविणे : ३ जुलै

- प्रवेश ऑनलाइन निश्चित करणे, प्रवेश रद्द करणे, प्रवेश नाकारणे, मिळालेल्या महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे : ३ ते ५ जुलै

- प्रवेशित विद्यार्थ्यांची स्थिती पोर्टलवर नोंदविण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांसाठी वेळ : ५ जुलै

विद्यार्थ्यांसाठी सूचना :

१. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा असल्यास विद्यार्थी लॉगिनमध्ये ‘प्रोसिड फॉर ॲडमिशन’ वर क्लिक करावेत. त्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत आणि संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा.

२. एखाद्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा नसेल, तर तो पुढील फेऱ्यांसाठी थांबू शकतो.

३. प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळाल्यास तेथे प्रवेश घेणे अनिवार्य आहे. परंतु तरीही प्रवेश न घेतल्यास अथवा नाकारल्यास संबंधित विद्यार्थ्याला पुढील एक नियमित फेरीसाठी प्रतिबंधित करण्यात येईल.

४. निश्चित केलेला प्रवेश रद्द करायचा असल्यास, त्यासाठी संबंधित विद्यालयास विनंती करून प्रवेश रद्द करावा. प्रवेश रद्द केलेले विद्यार्थीही पुढील एका नियमित फेरीसाठी प्रतिबंधित होतील.

कोटांतर्गत प्रवेशाची दुसरी फेरीही मंगळवारपासून सुरू होणार

कोटांतर्गत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पसंती २७ ते २९ जूनदरम्यान नोंदविता येणार आहे. तसेच प्रवेशासाठी पात्र आणि निवडलेल्या विद्यार्थ्यांची यादी महाविद्यालय स्तरावर ३ जुलै रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहेत. यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ३ ते ५ जुलै दरम्यान प्रवेश निश्चित करता येणार आहे.


Related News