Higher Education

Higher Education

अमेझॉन इंडियातर्फे जेईई सह अन्य स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी क्रॅश कोर्स उपलब्ध

PUBLISH DATE 15th January 2021

अमेझॉन इंडियाने बुधवारी अमेझॉन अकॅडमीच्या स्थापणेची घोषणा केली आहे.

जेईई (JEE) च्या परीक्षेच्या तयारीसाठी मुलांना मदत व्हावी म्हणून अमेझॉन अकॅडमीची सुरुवात करण्यात येत असल्याचं अॅमेझॉन इंडियाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.

या संबंधी कंपनीच्या वतीनं एक निवेदन प्रसिध्द करण्यात आलं आहे.

अमेझॉन अकॅडमीच्या वतीनं जेईईच्या परीक्षेसाठी आवश्यक असणारी सर्व प्रकारची तयारी ही ऑनलाइन पध्दतीनं करुन घेण्यात येणार आहे. तज्ज्ञाच्या लाईव्ह लेक्चर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनातील प्रत्येक शंकेचं निरसन करण्यात येणार असल्याचं अॅमेझॉन अकॅडमीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

गणित, फिजिक्स आणि केमेस्ट्री या विषयातील नियमित सराव, प्रत्येक विषयाचं सखोल ज्ञान, संबंधित मटेरियल, लाईव्ह लेक्चर्स आणि स्पर्धात्मक मूल्यांकन या गोष्टी विद्यार्थ्यांना उपलब्ध होतील असंही अमेझॉन इंडियाने आपल्या निवेदनात स्पष्ट केलंय. तसेच विद्यार्थ्यांसाठी नियमित प्रॅक्टिस टेस्ट, क्रॅश कोर्स सुरु करण्यात येणार आहेत असंही सांगण्यात येत आहे.

जेईई अभ्यासक्रम डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांना खास परीक्षेच्या दृष्टीकोनातून तज्ज्ञांकडून तयार करण्यात आलेले स्टडी मटेरियल उपलब्ध करुन दिलं जाणार आहे. त्यामध्ये 15 हजाराहून अधिक प्रश्नांचा त्यांच्या उत्तराच्या विश्लेषणासहित समावेश असेल.

अमेझॉन अकॅडमीतर्फे तयार करण्यात आलेले स्टडी मटेरियल हे देशातल्या विविध तज्ज्ञांकडून मागवण्यात आले आहे. याचा फायदा जेईईचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबतच बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड सायन्स (BITSAT), वेल्लोर  इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VITEEE), एसआरएम  इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी (SRMJEEE) या परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही फायदेशीर ठरणार आहे. हे स्टडी मटेरियल अत्यंत गुणवत्तापूर्ण असल्याचा दावा अमेझॉन अकॅडमीकडून करण्यात येत आहे.

अमेझॉन अकॅडमीचे हे स्टडी मटेरियल विदयार्थ्यांसाठी सध्या मोफत उपलब्ध होत असून पुढील काही महिन्यांपर्यंत हे मोफत असेल असेही कंपनीच्या वतीनं सांगण्यात आलंय.

अमेझॉन अकॅडमीने या संबंधी एक निवेदन प्रसिध्द केलं असून त्यात म्हंटलं आहे की, "उच्च गुणवत्तापूर्ण आणि सर्वांना परवडेल अशा शिक्षणाचा प्रसार करणे हे अमेझॉनचे ध्येय आहे. सध्या केवळ जेईई परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी अशा प्रकारचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे पण भविष्यात इतर सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अमेझॉन इंडिया सुविधा उपलब्ध करुन देणार आहे."

 

NTA JEE Main 2021 | जेईई मेन्स परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, इंग्रजीसोबत पहिल्यांदाच मराठीसह तेरा मातृभाषेत परीक्षा देता येणार