Higher Education

Higher Education

‘ एमएफए’च्या पात्रतेत बदल

PUBLISH DATE 22nd November 2017

 

‘बीएफए’ची अट असताना नव्याने डिप्लोमाची अट

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मास्टर्स ऑफ फाइन आर्ट्‍‍स (एमएफए) या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी बॅचरल ऑफ फाइन आर्ट्‍‍स (बीएफए) पदवीची पात्रता असताना गव्हर्नमेंट डिप्लोमा इन आर्ट्‍‍स (जीडी आर्ट) डिप्लोमा उत्तीर्ण होण्याची पात्रता निश्चित केली आहे.
त्यामुळे या डिप्लोमाच्या आधारे भविष्यात विद्यापीठाशी संलग्न आणि राज्यातील इतर कॉलेजांमध्ये ‘एमएफए’ करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात सर्व विद्यापीठांनी ‘एमएफए’च्या प्रवेशासाठी केवळ ‘बीएफए’ची पात्रता ठेवली असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मागे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
फाइन आर्ट्‍‍समध्ये ‘एमएफए’सारख्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, राज्याच्या कला संचालनालयाने एमएफए (पेंटिंग, स्क्लप्चर, अप्लाइड आर्ट) अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी ‘बीएफए’ची पदवी पात्रता निर्धारित केली आहे. विद्यापीठ प्रशासनाने प्रवेशासाठी ‘बीएफए’सोबतच जीडी आर्ट हा डिप्लोमा अभ्यासक्रम पात्रता म्हणून ठेवला आहे. प्रत्यक्षात ‘बीएफए’ ही चार वर्षांची पदवी आहे. तर, ‘जीडी आर्ट’ हा पदविका अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम दहावीनंतर पाच वर्षांचा आहे. त्यामध्ये पहिले वर्ष ‘फाउंडेशन कोर्स’ असते. त्यामुळे ‘बीएफए’ आणि ‘जीडी आर्ट’ समांतर असू शकत नाही. मात्र, असे असतानाही विद्यापीठाने जीडी आर्ट डिप्लोमा उत्तीर्ण करणारे विद्यार्थी ‘एमएफए’ला प्रवेश घेऊ शकतात, अशी शैक्षणिक पात्रता गेल्या कित्येक वर्षांपासून कायम ठेवली आहे. त्यामुळे विद्यार्थी डिप्लोमाच्या पात्रतेवर येत्या शैक्षणिक वर्षात विद्यापीठाशी संलग्न कॉलेजांमध्ये विद्यार्थ्यांना ‘एमएफए’ आणि ‘अॅप्लाइड आर्ट’शी संबंधित पदव्युत्तर पदवी, पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार नाही. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात येऊ शकते.
दरम्यान, ‘बीएफए’ आणि ‘जीडी आर्ट डिप्लोमा’ हे दोन्ही अभ्यासक्रम समकक्ष नाहीत. असे असतानाही विद्यापीठ, कला संचालनालय आणि शैक्षणिक संस्थांकडून विद्यार्थ्यांना दोन्ही अभ्यासक्रम समकक्ष असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच या डिप्लोमाच्या आधारे विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या कॉलेजांमध्ये यापूर्वीही डिप्लोमाच्या शैक्षणिक पात्रतेवर प्र‍वेश घेण्याची शक्यता नाकारता येणार आहे. ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठानेही एमएफला प्रवेश घेण्यासाठी डिप्लोमाची शैक्षणिक पात्रता ठेवली होती. विद्यापीठाला चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी ही पात्रता काढून टाकली. मात्र, शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर असणारे पुणे विद्यापीठ इथे मागे आहे. त्यामुळे विद्यापीठाने याबाबत योग्य तो बदल करावा,’ असे मत सामाजिक कार्यकर्ते अभिषेक हरिदास यांनी मांडले.

बीएफए पदवी आणि जीडी आर्ट डिप्लोमा हे दोन्ही अभ्यासक्रम समकक्ष नाहीत. बीएफए बारावीनंतर चार वर्षांचा, तर जीडी आर्ट डिप्लोमा दहावीनंतर पाच वर्षांचा आहे. त्यामुळे बीएफएचा कालावधी एकूण (१०+२+४) तर, जीडी आर्ट डिप्लोमा (१०+१+४) असा आहे. डिप्लोमाच्या पात्रतेवर राज्यातील कोणत्याही विद्यापीठाने विद्यार्थ्यांना एमएफएला प्रवेश देऊ नये, अशी नोटीस दिली आहे. विद्यार्थ्यांनी जीडी अप्लाइड आर्ट डिप्लोमा केल्यानंतर एका वर्षांचा ब्रिज कोर्स केल्यास त्यांना एमएफएला प्रवेश घेता येईल. त्यासाठी विद्यापीठांना अॅकेडमिक कौन्सिलमध्ये निर्णय घ्यावा लागेल.

- राजीव मिश्रा, प्रभारी कला संचालक, कला संचालनालय