Medical Admissions 2020-21

Medical Admissions 2020-21

‘नीट-पीजी’साठी निगेटिव्ह मार्किंग

PUBLISH DATE 6th October 2017

पुणे : वैद्यकीय क्षेत्रातील एमएस, एमडी आदी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेत (नीट-पीजी) यंदापासून प्रथमच ‘निगेटिव्ह मार्किंग’ प्रणालीचा अंतर्भाव करण्यात येणार आहे. नव्या नियमानुसार एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकल्यास एक गुण कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना पेपर काळजीपूर्वक सोडवावा लागणार आहे. तसेच, देशातील मेडिकल कॉलेजांमध्ये या अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता मुळातच कमी असल्याने प्रवेशासाठी चुरस वाढणार आहे.
सरकारी, खासगी आणि अभिमत विद्यापीठांमधील मेडिकल कॉलेजांमधील पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांचे प्रवेश ‘नीट’द्वारे होतात. विद्यार्थ्यांना ‘एमबीबीएस’नंतर मेडिकल कॉलेजांमध्ये एमएस, एमडी, डिप्लोमा या विविध विषयांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांना २०१८-१९ या शैक्षणिक वर्षांसाठी प्रवेश घेण्यासाठी ‘नीट-पीजी’ द्यावी लागणार आहे. या परीक्षेची सुरुवात झाल्यापासून निगेटिव्ह मार्किंग पद्धत नव्हती. मात्र, परीक्षा घेणाऱ्या ‘नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन’ने (एनबीइ) नुकतीच एक अधिसूचना जारी केली. त्यानुसार या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंगचा अंतर्भाव करण्यात आला आहे.
‘नीट-पीजी’ परीक्षा डिसेंबर महिन्यात होणार आहे. परीक्षेसाठीची नोंदणी काही दिवसांत सुरू होणार आहे. ही परीक्षा ऑनलाइन होणार आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्य़ाची जबाबदारी खासगी बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीला देण्यात आली आहे. परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना एकूण ३०० प्रश्न सोडवावे लागणार आहे. प्रत्येक प्रश्न अचूक सोडविल्यावर चार गुण मिळणार आहेत. मात्र, उत्तर चुकल्यास एक गुण कमी होणार आहे. प्रश्नाचे उत्तर न सोडविल्यास शून्य गुण देण्यात येणार आहेत. देशात एमएस, एमडी, डिप्लोमा या अभ्यासक्रमांसाठी कॉलेजांमध्ये मुळातच जागा कमी आहेत. अशातच परीक्षेत निगेटिव्ह मार्किंगची प्रणाली आल्यामुळे मिळणाऱ्या गुणांच्या टक्केवारीत घट होणार आहे. त्यामुळे चांगल्या कॉलेजांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांमधील चुरस वाढणार आहे. दरम्यान, यंदापासून परीक्षेला नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे आधार क्रमांक असणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही, त्यांनी ते त्वरित काढावे अशा सूचना ‘एनबीई’तर्फे करण्यात आल्या आहेत. परीक्षेला ‘एमबीबीएस’ झालेले विद्यार्थी मोठ्या संख्येने अर्ज करतात.

राज्यातील विद्यार्थ्यांसमोर आव्हान
राज्यात खासगी, सरकारी कॉलेज आणि अभिमत विद्यापीठांमध्ये एमएस आणि एमडी अभ्यासक्रमांची एकूण प्रवेशक्षमता गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार १,५७१ आहे. तर, डिप्लोमा अभ्यासक्रमांची प्रवेशक्षमताही २८० आहे. एवढ्या तोकड्या प्रवेशक्षमतेमुळे राज्यातील विद्यार्थ्यांना चांगल्या कॉलेजात प्रवेश मिळविण्यासाठी अन्य राज्यांतील विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा करावी लागणार आहे, अशीच शक्यता निर्माण झाली आहे.