IISER

IISER

शास्त्रज्ञांसाठी संधी निर्मितीचे आव्हान

PUBLISH DATE 3rd November 2017

प्रा. उदगावकर यांचे प्रतिपादन; ‘आयसर’चे संचालक म्हणून रूजू

‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चमुळे (आयसर) देशात शास्त्रज्ञांची नवी पिढी घडत आहे. आयसरच्या आंतरविद्याशाखीय आणि संशोधनावर आधारीत शिक्षण पद्धतीमध्येच विज्ञान क्षेत्राचे भवितव्य अवलंबून आहे. मात्र, सध्या देशातील संशोधन क्षेत्रातील अत्यल्प संधी पाहता, अशा संस्थांमधून निर्माण होणाऱ्या शास्त्रज्ञांना सामावून घेणारी व्यवस्था निर्माण करणे हे मोठे आव्हान आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि आयसर- पुणेचे नवे संचालक प्रा. जयंत उदगावकर यांनी केले.
पुण्यातील ‘आयसर’चे पहिले संचालक डॉ. के. एन. गणेश यांच्याकडून प्रा. उदगावकर यांनी बुधवारी पदाची सूत्रे स्वीकारली. या निमित्ताने मावळत्या आणि नवनियुक्त संचालकांनी पत्रकारांशी संवाद साधला. या प्रसंगी ‘आयसर’मधील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद नातू उपस्थित होते. प्रा. उदगावकर यांनी गेली ३० वर्षे बेंगळुरूच्या ‘नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस’मधून (एनसीबीएस) जैवभौतिकशास्त्रात संशोधन केले आहे.
प्रा. उदगावकर म्हणाले, ‘शास्त्रज्ञांसोबत संशोधन करता करता शिकण्याची आयसरची शिक्षण पद्धती नावीन्यपूर्ण असून, त्यातून येत्या काळात देशाला चांगले शास्त्रज्ञ मिळणार आहेत. आयसरमधील शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना परदेशात पीएचडीसाठी चांगल्या संधीही मिळत आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत देशात संशोधन क्षेत्रात नोकरीच्या अत्यल्प संधी निर्माण झाल्या आहेत. परदेशात गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी देशात परत यावे असे आपल्याला वाटत असेल तर त्यांच्यासाठी तशा संधीही निर्माण कराव्या लागतील. संशोधन क्षेत्राप्रमाणेच सरकारसमोरील हे मोठे आव्हान आहे.’

फक्त एका दशकाच्या कालावधीत आयसरने केलेल्या कामगिरीबाबत समाधानी असल्याची भावना डॉ. गणेश यांनी या वेळी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘गेल्या अकरा वर्षांत जगभरातून प्रतिभावान संशोधक- प्राध्यापक, तसेच देशभरातून अत्यंत हुशार विद्यार्थी आयसरकडे आकर्षित करण्यात आम्हाला यश आले. आयसरची सुरवात दमदार असली तरी, त्यात सातत्य राखण्यासाठी सरकारचेही पाठबळ तितकेच गरजेचे आहे.’
डॉ. गणेश यांची आयसर- तिरुपतीचे संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे.

‘निधी वाढविण्याची गरज’
विज्ञान संशोधनासाठी निधी वाढण्याची गरज प्रा. जयंत उदगावकर यांनी व्यक्त केली. विज्ञानासाठीचा दरडोई खर्च आपल्याकडे कमी आहे. एकूण जीडीपीतील विज्ञानावरील खर्च वाढणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले. ‘संशोधनासाठी उपलब्ध होणारा निधी हा नागरिकांच्या करांतून मिळत असतो. आपले संशोधन सर्वसामान्यांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी कसे उपयुक्त ठरेल याची जाणीव शास्त्रज्ञांनीही ठेवणे आवश्यक आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘आयओई’साठी प्रयत्न
देशातील सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रांतील प्रत्येकी दहा विद्यापीठांना सुप्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांचा (इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्स – आयओई) दर्जा बहाल करून त्यांना पाचशे कोटी रुपयांचा निधी देण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. हा दर्जा प्राप्त करण्यासाठीची प्रक्रिया पुण्यातील आयसरमध्ये सुरू झाल्याचे प्रा. के. एन. गणेश यांनी सांगितले. देशभरात एकूण आयसर असून, त्यामध्ये पुण्यातील आयसर अग्रेसर असल्याचेही त्यांनी नमूद केले.

 

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

GET Free Educational Updates (Entrance Exam, Admissions, Jobs & many more...) Alerts on WhatsApp, Send message on 7720025900

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर. <नाव> <शहराचे नाव> <नोकरी>७७२०० २५९०० मेसेज व्हॉटस्अॅपवर पाठवा

https://goo.gl/YPjt94

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------