Higher Education

Higher Education

मुलींसाठीही एनडीए व सैनिकी शाळा होणार खुली ?

PUBLISH DATE 9th March 2018

लष्करात दाखल होऊन राष्ट्रसेवा करू इच्छिणाऱ्या मुलींसाठी एक आनंदाची बातमी. लष्करात महिलांना अधिक संधी देण्याच्या दृष्टीने संरक्षण मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. संरक्षण विभागासंदर्भातील संसदीय स्थायी समितीच्या विचाराधीन असलेला निर्णय मान्य झाल्यास पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीसह (एनडीए) देशातील सर्व सैनिकी शाळांची द्वारेही मुलींसाठी खुली होणार आहेत. लवकरच त्याबाबत अंतिम निर्णय अपेक्षित आहे.

देशाच्या लष्कर, नौदल व हवाई दल या तिन्ही संरक्षण दलांमध्ये काही प्रमाणात महिला कार्यरत आहेत. मात्र, त्यांना मर्यादित काळासाठी (शॉर्ट सर्व्हिस कमिशन) नियुक्त करण्यात येते. त्याचबरोबर या महिलांना प्रत्यक्ष युद्ध किंवा लढाईत (कॉम्बॅट रोल )सहभागी केले जात नाही. या पार्श्वभूमीवर तिन्ही संरक्षण दलांमध्ये महिलांना अधिक वाव दिला जावा,अशी मागणी होत होती. त्यानुसार हवाई दलाने आपल्या लढाऊ विमानांसाठी वैमानिक म्हणून महिलांना संधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तीन महिला वैमानिकांनी अत्याधुनिक लढाऊ विमानांवर प्रशिक्षित करण्यात आले असून त्या लढाऊ विमानांच्या वैमानिक म्हणून हवाई दलात सहभागी झाल्या आहेत. नौदलाने अजून असा निर्णय घेतला नसला तरी नौदलासाठी नव्याने निर्माण करण्यात येत असलेल्या युद्धनौकांमध्ये महिला अधिकारी, नौसैनिकांसाठी खास व्यवस्था निर्माण केल्या जात आहेत. त्यामुळे लवकरच नौदलाच्या युद्धनौकांवरही महिला अधिकारी, सैनिक सेवा बजावू शकतील. लष्करात महिलांना कॉम्बॅट रोल देण्याबाबत निर्णय झालेला नसला, तरी येत्या काळात असा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे, त्यादृष्टीनेच पूर्वतयारी म्हणून हा निर्णयाकडे पाहिले जात आहे. 

देशभरातील सैनिकी शाळा तसेच पुण्यातील खडकवासला येथे असलेल्या देशातील एकमेव राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (एनडीए) फक्त मुलांनाच प्रवेश दिला जातो. मात्र, इथेही मुलींना प्रवेश मिळावा, अशी मागणी गेल्या काही काळापासून केली जात आहे. त्याबाबत संसदेच्या संरक्षणविषयक स्थायी समितीच्या सदस्यांकडे याबाबतच्या काही शिफारसी आल्या होत्या. या सदस्यांनी स्थायी समितीच्या बैठकीत त्याबाबत प्रस्ताव मांडत या संस्थांमध्ये मुलींनाही प्रवेश द्यावा, अशी मागणी केली होती, अशी माहिती संरक्षण मंत्रालयातील उच्चस्तरीय सूत्रांनी 'मटा'ला दिली. 


Related | JEE Main 2018  |  NEET UG |  JEE Advanced 2018. | NDA


त्याचबरोबर या संदर्भात काही महिन्यांपूर्वी संसदेत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी उत्तर दिले होते.'देशातील सैनिकी शाळांमध्ये व एनडीएमध्ये मुलींनाही प्रवेश दिला जावा, या प्रस्तावावर केंद्र सरकार विचार करत आहे. एनडीएमध्ये फक्त मुलांनाच प्रवेश मिळतो. त्यासाठीच या मुलींना देशभरातील विविध सैनिकी शाळांमध्ये प्रवेश देण्याचा प्रस्ताव आहे. येथील प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर एनडीएच्या प्रवेशप्रक्रियेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थिनींना एनडीएमध्ये प्रवेश देण्याबाबतचा हा प्रस्ताव आहे. संसदेच्या संरक्षणविषयक स्थायी समितीनेच ही मागणी केली आहे. त्यावर विचार सुरू आहे,' असे डॉ. भामरे यांनी म्हटले होते. 

'एनडीएमध्ये मुलींना प्रवेश दिला जात नाही. एनडीएचा अभ्यासक्रम खडतर आहे. एनडीएमध्ये मुलींना प्रवेश द्यायचा झाल्यास त्यादृष्टीने त्यांची पूर्वतयारी असणे आवश्यक आहे. त्यासाठीच त्यांना सैनिकी शाळांमध्ये प्रवेश दिला जाईल. तिथे त्या दोन किंवा तीन वर्षांचे प्रशिक्षण घेतील. हे प्रशिक्षण यशस्विरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थिनी एनडीएची प्रवेश परीक्षा देतील. त्यात यशस्वी होणाऱ्या विद्यार्थिनींना एनडीएमधील प्रशिक्षणासाठी निवड केली जाईल,' अशी माहितीही या सूत्रांनी दिली. 

नव्या सैनिकी शाळा
देशभरात सध्या २६ सैनिकी शाळा आहेत. इथे फक्त मुलांनाच प्रवेश मिळतो. त्याचबरोबर आणखी २१ शाळांचे प्रस्ताव मंजुरीसाठी दाखल झाले आहेत. त्यांना लवकरच मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सैनिकी शाळांमध्ये मुलींना प्रवेश द्यायचा निर्णय झाल्यास त्यांच्यासाठी पुरेशा जागा निर्माण होणार आहेत. 

स्वतंत्र संस्थेचाही प्रस्ताव
एनडीए ही तिन्ही संरक्षण दलांचे प्राथमिक प्रशिक्षण देणारी देशातील एकमेव संस्था आहे. तिथे फक्त मुलांनाच प्रवेश मिळतो. त्यादृष्टीनेच येथील व्यवस्थाही निर्माण करण्यात आली आहे. इथे मुलींना प्रवेश द्यायचा झाल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करावी लागेल. तसेच यातून काही अन्य समस्या उद्भवू नयेत, यासाठी फक्त मुलींसाठीच स्वतंत्र संरक्षण प्रबोधिनीची स्थापना केली जावी, अशी मागणीही संसदेच्या संरक्षण विषयक स्थायी समितीकडे करण्यात आली आहे. त्यावरही विचार सुरू आहे. 

Related | JEE Main 2018  |  NEET UG |  JEE Advanced 2018. | NDA

Click here Details of All  : Entrance Exams 2018

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------