Medical Admissions 2020-21

Medical Admissions 2020-21

मेडिकलची प्रवेश प्रक्रिया आजपासून

PUBLISH DATE 7th June 2018

मेडिकलची प्रवेश प्रक्रिया आजपासून

विद्यार्थ्यांना येत्या १७ जूनपर्यंत ऑनलाइन पद्धतीने करता येणार अर्ज

राज्यातील खासगी आणि सरकारी कॉलेजांमध्ये एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस आदी मेडिकलच्या पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेला आज, गुरुवार, सात जूनपासून सुरुवात होत आहे. या प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना १७ जूनपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत, असे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) सांगण्यात आले आहे.

देशात आणि राज्यातील मेडिकल कॉलेजांसोबतच अभिमत विद्यापीठांमध्ये मेडिकलच्या पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश 'नीट' प्रवेश परीक्षाच्या गुणांनुसार होते. काही दिवसांपूर्वी घेण्यात आलेल्या 'नीट' परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार, सीईटी सेलने प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या प्रवेश परीक्षेच्या वेळापत्रकानुसार, विद्यार्थ्यांना गुरुवार, ७ जून ते १७ जूनपर्यंत वेबसाइटवरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज केल्यानंतर विद्यार्थ्यांना चलन डाउनलोड करून ते १८ जूनपर्यंत 'एसबीआय'च्या शाखेत भरायचे आहे. त्यानंतर प्राथमिक गुणवत्ता यादी १९ जूनला सायंकाळी पाचनंतर जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना आठ मेडिकल कॉलेजांमध्ये २१ ते २५ जूनदरम्यान कागदपत्रांची पडताळणी करायची आहे. सुधारित गुणवत्ता यादी २६ जूनला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना कॉलेजांचे प्राधान्यक्रम २६ ते २९ जूनपर्यंत भरायचे आहेत. त्यानंतर प्रवेशाची पहिली यादी दोन जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना १२ जुलैपर्यंत प्रवेश घेता येणार आहेत, तर कॉलेजांमध्ये शैक्षणिक सत्राला सुरुवात एक ऑगस्टपासून होणार आहे, असे सीईटी सेलने सांगितले आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहिती वेबसाइटवर मिळेल, असे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.

कागदपत्र पडताळणी केंद्रे

- ग्रँट मेडिकल कॉलेज, मुंबई

- पोदार आयुर्वेदिक कॉलेज, वरळी, मुंबई

- बी. जे. मेडिकल कॉलेज, पुणे

- शासकीय वैद्यकीय कॉलेज, नागपूर

- शासकीय आयुर्वेदिक कॉलेज, नागपूर

- शासकीय वैद्यकीय कॉलेज, औरंगाबाद

- शासकीय आयुर्वेदिक कॉलेज, नांदेड

- शासकीय आयुर्वेदिक कॉलेज, नागपूर

- शासकीय आयुर्वेदिक कॉलेज, उस्मानाबाद

वेळापत्रक

अर्ज भरायला सुरुवात : ७ ते १७ जून

चलन भरण्याची अखेरची तारीख : १८ जून

प्राथमिक गुणवत्ता यादी : १९ जून

एनआरआय विद्यार्थी कागदपत्रे पडताळणी : २१ ते २५ जून (ग्रँट मेडिकल कॉलेज, मुंबई )

कागदपत्रे पडताळणी : २१ ते २५ जून

सुधारित गुणवत्ता यादी : २६ जून

ऑनलाइन पद्धतीने अर्जात प्राधान्यक्रम भरणे : २६ ते २९ जून

पहिली प्रवेशाची यादी : २ जुलै

प्रवेश घेण्याची शेवटची तारीख : १२ जुलै

शैक्षणिक वर्षाला सुरुवात : १ ऑगस्ट

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या वेबसाइट

www.mahacet.org

www.dmer.org