Schools

Schools

आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्तम शिक्षण - १३ ओजस शाळा सुरू करणार

PUBLISH DATE 30th June 2018

राज्यातील मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्तम शिक्षण मिळावे यासाठी शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून राज्यात १३ ओजस शाळा सुरू करण्यात येत आहेत. शाळांमध्ये अध्ययन-अध्यापन आंतरराष्ट्रीय मानांकाचे व्हावे यावर मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षकांनी भर द्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केले.

शुक्रवारी सह्याद्री अतिथीगृह येथे १३ ओजस शाळांसंदर्भातील आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोलंकी यांच्यासह १३ शाळांचे मुख्याध्यापक आदी उपस्थित होते. तावडे यावेळी म्हणाले की, ग्रामविकास आणि शालेय शिक्षण यांनी समन्वयातून या शाळा चालवाव्यात. तसेच शिक्षक, मुख्याध्यापकांनी अभ्यासक्रम, शिक्षण पद्धत, विद्यार्थ्यांच्या स्मरणावर अधिकाधिक भर देणे आवश्यक आहे. ओजस शाळांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा दर्जा उंचावेल याला प्राधान्य देऊन विद्यार्थ्यांना लोकल टू ग्लोबल करणे आवश्यक आहे. ४ जुलैपासून सुरू होणाऱ्या नागपूर अधिवेशनात सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री, शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक यांच्याबरोबर संयुक्त बैठक घेऊन यासंदर्भात शाळांनी केलेल्या मागणीबाबत आढावा घेण्यात येईल, असेही तावडे यांनी या बैठकीत सांगितले.