Engineering

Engineering

मॅनेजमेंट कोटा नियमानुसार भरा

PUBLISH DATE 18th August 2017

तंत्रशिक्षण कार्यालयाच्या कॉलेजांना सूचना

खासगी आणि अल्पसंख्याक कॉलेजांनी इंजिनीअरिंग, फार्मसी, हॉटेल मॅनेजनेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी, एमसीए, आर्किटेक्चर, मॅनेजमेंट आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या मॅनेजमेंट आणि रिक्त जागा तंत्र शिक्षण संचलनालयाने दिलेल्या सूचनेनुसारच भरायच्या आहेत. कॉलेजांना या जागा परस्पर भरता येणार नसून, संचलनालयाच्या पारदर्शक प्रवेश प्रक्रियेद्वारे भरायच्या आहेत, अशा सूचना तंत्र शिक्षण विभागीय कार्यालयाने दिल्या आहेत.
राज्यात तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारित येणाऱ्या इंजिनीअरिंग, फार्मसी, हॉटेल मॅनेजनेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी, एमसीए, आर्किटेक्चर, मॅनेजमेंट विद्याशाखेत पदवी, पदविका, पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम चालतात. या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे ‘कॅप’ फेऱ्यांच्या माध्यमातून राबविण्यात येते. मात्र, गेल्या काही वर्षापासून विद्यार्थ्यांचा ओढा व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्याचा कल कमी होत आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमांच्या कॉलेजांमध्ये जागा रिक्त राहात आहेत.
त्यामुळे या रिक्त जागा, मॅनेजमेंट कोट्यातील जागा आणि अल्पसंख्याक कॉलेजांमधील जागा कॉलेजांना संचलनालयाने ठरवून दिलेल्या प्रवेश प्रक्रियेप्रमाणे भरायच्या आहेत. त्यानुसार कॉलेजांनी एकंदरीत रिक्त जागांची माहिती जाहिरातीद्वारे वेबसाइटवर प्रसिद्ध करायची आहे. त्यानंतर प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवायचे येतील. कॉलेजच्या सक्षम अधिकाऱ्याकडून अर्ज व कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल. या अर्जांची पडताळणी झाल्यानंतर गुणवत्तेनुसार प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी वेबसाइट तसेच कॉलेजच्या प्रसिद्धी फलकावर जाहीर करावी लागेल. यादीनुसार कॉलेजांना विद्यार्थ्यांचे प्रवेश करायचे आहे. दरम्यान, ‘कॅप’मध्ये रिक्त राहिलेल्या जागा आणि त्या जागांवर मॅनेजनेंट कोट्यात झालेल्या प्रवेशांची माहिती संचलनालयाला संगणकीय प्रणालीतून कळवायची आहे. तसेच, कॉलेजांना या प्रवेशांची मान्यता तंत्रशिक्षण संचलनालय आणि प्रवेश नियंत्रण प्राधिकरणाकडून घ्यायची आहे. ही प्रवेश प्रक्रिया पारदर्शी होण्यासाठी तंत्र शिक्षणच्या विभागीय कार्यालयाने पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातील सर्व कॉलेजच्या प्राचार्यांना या सूचना दिल्या असून त्यानुसार प्रवेश प्रक्रिया करण्याचे आदेश दिले आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी पाठपुरावा केला आहे. यातील अनेक अभ्यासक्रमांना प्रवेशाची कट ऑफ तारीख ३१ ऑगस्ट अशी ठरविण्यात आली आहे.

‘अडवणूक होणार नाही’
मॅनेजमेंट कोट्यातील अथवा कॅप फेरीतील रिक्त राहणाऱ्या जागांवर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांने अचानक प्रवेशाच्या कट ऑफ तारखेपूर्वी प्रवेश रद्द केल्यास संबंधित विद्यार्थ्याचे केवळ एक हजार रुपये कॉलेज प्रशासनाला घ्यायचे आहे. प्रशासनाला उर्वरित शुल्काची रक्कम विद्यार्थ्याला परत करायची आहे. मात्र, कट ऑफ तारखेनंतर विद्यार्थ्यांने प्रवेश रद्द केल्यास त्याला शुल्कात परतावा मिळणार नाही. दरम्यान, प्रवेश रद्द करणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे कॉलेज प्रशासनाला द्यावी लागणार आहेत. विद्यार्थ्याने शुल्क भरावे म्हणून त्यांची कागदपत्रांद्वारे अडवणूक करता येणार नाही, असे कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

Find Your Dream Job: https://goo.gl/YPjt94