Engineering

Engineering

कोचिंग क्लासच्या मार्केटिंगसाठी ‘पोस्टर बॉइज’

PUBLISH DATE 25th October 2017

पुणे : ‘सीईटी’ असो, ‘जेईई’ असो किंवा ‘नीट’ असो... कुठलीही गुणवत्ता यादी काढा, आमच्या क्लासचे विद्यार्थी त्यात कायम असतील... अशी जाहिरात अनेक बड्या बड्या कोचिंग क्लासकडून केली जाते. त्यासाठी असे खास ‘पोस्टर बॉइज’ निवडले जातात आणि त्यांच्या यशाच्या जीवावर क्लासच्या मार्केटिंगचे चक्र चालते.
क्लासला विद्यार्थी मिळवायचे, तर मार्केटिंग करावेच लागणार; पण हे मार्केटिंग करताना आपल्याकडचेच विद्यार्थी कसे यशस्वी होतात, हे दर्शविण्यासाठी या मुलांचे फोटो, परीक्षेतील मार्क याचे फ्लेक्स जागोजागी लावले जातात. विविध माध्यमांमध्ये जाहिराती देण्यात येतात. त्यासाठी हे ‘पोस्टर बॉइज’ कामाला येतात. त्याची निवड प्रक्रियाही मोठी रंजक आहे.
अनेक बड्या बड्या क्लासतर्फे इयत्ता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता चाचणी घेण्यात येते. ही चाचणी सर्वांसाठी खुली असते. चाचणी घेतानाच ‘सीईटी’, ‘जेईई’ किंवा ‘नीट’साठी पूर्णतः मोफत किंवा सवलतीत प्रशिक्षणाचे आमिषही दाखविण्यात येते. ग्रामीण भागातही या चाचणीचा प्रचार-प्रसार केला जातो. या परीक्षेत मुलांची बुद्ध्यंक चाचणी घेतली जाते. त्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कौन्सेलिंगसाठी बोलावून त्यांच्या गुणवत्तेची पुन्हा तपासणी केली जाते. त्यातील सर्वोत्तम १० ते ५० विद्यार्थ्यांची निवड केली जाते. त्यानंतर त्यांच्या पालकांना बोलावून त्यांना, ‘विद्यार्थ्यामध्ये गुणवत्ता असून, त्याला यशस्वी व्हायचे असेल, तर आमच्या ताब्यात द्या,’ अशी गळ घातली जाते. पालकांच्या मान्यतेनंतरच या मुलांचे ‘पोस्टर बॉइज’मध्ये रूपांतर होते.
ही मुले गावाकडची असोत किंवा शहरातील, त्यांना त्यांच्या कुटुंबापासून दूर या क्लासनेच घेतलेल्या फ्लॅट किंवा हॉस्टेलवर ठेवले जाते. ही सर्व व्यवस्था मोफत असते. एकेका फ्लॅटमध्ये आठ-दहा मुले असतात. हॉस्टेल किंवा फ्लॅटमध्ये सर्व आवश्यक पुस्तके आणि इतर साहित्य उपलब्ध असते. या मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी एका व्यक्तीची नेमणूकही केली जाते. या मुलांच्या राहण्या-खाण्याची सर्व व्यवस्था क्लासकडूनच केली जाते. क्लासचे टाय-अप असलेल्या एखाद्या कॉलेजमध्ये या मुलांना प्रवेश दिला जातो. त्यामुळे हजेरीचा प्रश्नच उद्‍भवत नाही. क्लासमध्ये त्यांना इतर मुलांबरोबरच शिकवले जाते; परंतु क्लासची वेळ संपल्यानंतर या फ्लॅट किंवा हॉस्टेलमध्ये या विद्यार्थ्यांना खास प्रशिक्षण दिले जाते.
या काळात दिवाळीसारखा मोठा सण सोडला, तर या विद्यार्थ्यांना सुटीही मिळत नाही. मोबाइल फोन, इंटरनेट अशा सुविधांपासूनही या विद्यार्थ्यांना दूर ठेवले जाते. पालक मर्यादित वेळेतच या विद्यार्थ्यांना भेटू शकतात. अशा पद्धतीने त्यांच्याकडून अभ्यास एके अभ्यास करवून घेण्यात येतो. विविध टेस्ट सीरिजही सोडवून घेतल्या जातात. त्यामुळे सहाजिकच हे विद्यार्थी मुख्य परीक्षेत उत्तम कामगिरी करतात. अशा २५-३० विद्यार्थ्यांपैकी ५-७ विद्यार्थी जरी गुणवत्ता यादीत झळकले, तरी या क्लासचे ध्येय साध्य होते. त्यानंतर तातडीने या विद्यार्थ्यांचे फोटो आणि त्यांचे मार्क यांच्या जाहिरातींचा भडिमार केला जातो. त्याद्वारे या क्लासचे शुल्क भरण्याची क्षमता असलेले शेकडो विद्यार्थी आपसूकच या क्लासमध्ये प्रवेश घेतात.
‘सध्या प्रत्येक गुणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यासाठी मुलांना सर्वोत्तम संधी देणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना काही काळ अशा वातावरणात राहावे लागले, तरी त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने हा निर्णय योग्य आहे, असे आम्हाला वाटते,’ असे एका पालकाने सांगितले.

क्लासचालक प्रवेश परीक्षांमध्ये गुणवत्ता शोधण्याचा प्रयत्न करतात. या मुलांचा बुद्ध्यंक उच्च असल्याने थोडी मेहनत घेतल्यास हे विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकतातच. त्यामुळेच हे क्लासचालक त्यांचे अभ्यासावरील लक्ष विचलित होणार नाही, याची दक्षता घेतात. एकदा हे विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले, की प्रत्येक मोठ्या शहरात सुमारे हजारभर प्रवेश नक्की होतात. हेच यामागचे गणित असते.
- एक क्लासचालक

 

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

GET Free Educational Updates (Entrance Exam, Admissions, Jobs & many more...) Alerts on WhatsApp, Send message on 7720025900

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर. <नाव> <शहराचे नाव> <नोकरी>७७२०० २५९०० मेसेज व्हॉटस्अॅपवर पाठवा

https://goo.gl/YPjt94

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------