Higher Education

Higher Education

गुणवत्तेनुसार मिळेल संधी - ‘बीएफए’चे प्रवेश सीईटीद्वारे

PUBLISH DATE 31st October 2017

‘बीएफए’चे प्रवेश सीईटीद्वारे करण्याचे विद्यापीठांना आदेश

पुणे : राज्यातील सर्व कॉलेजांमधील बॅचलर ऑफ फाइन आर्ट (अप्लाइड आर्टस् , पेटिंग तसेच स्क्लप्चर) अभ्यासक्रमाचे प्रवेश आगामी शैक्षणिक वर्षापासून सामायिक प्रवेश परीक्षेद्वारे (सीईटी) करण्यात यावेत. तसेच, विद्यापीठांच्या अखत्यारितील कॉलेजची सविस्तर माहिती उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे देऊन अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेची मान्यता घ्यावी, असे आदेश विभागाने राज्यातील सर्व विद्यापीठांना दिले आहेत. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षाची कॉलेजांमधील प्रवेश प्रक्रिया पारदर्शक होऊन विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश मिळणार आहे.
राज्यात कला संचालनालयाच्या अखत्यारित येणाऱ्या सरकारी आणि अनुदानित अशा केवळ नऊ कॉलेजांमध्ये संबंधित अभ्यासक्रमाचे प्रवेश ‘सीईटी’द्वारे होतात. त्यामध्ये मुंबईतील सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, सर जे .जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट शासकीय चित्रकला कॉलेज (नागपूर आणि औरंगाबाद) या सरकारी कॉलेजांसह राज्यातील पाच खासगी कॉलेजांचा समावेश आहे. दरम्यान, या कॉलेजांसोबत राज्यातील अनेक कॉलेजांमध्ये गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेल्या बीएफए (अप्लाइड आर्टस् , स्कलप्चर आणि पेंटिंग) अभ्यासक्रमाला ‘एआयसीटीई’ या शिखरसंस्थेची मान्यता नसल्याचा धक्कादायक प्रकार ‘मटा’ने समोर आणला होता. त्यानंतर या कॉलेजांमध्ये प्रवेशाबाबत सुसूत्रता नसल्याचे समोर आले होते. त्यामुळे प्रवेशाबाबत गोंधळ उडाला होता.
मात्र, आता नव्या नियमानुसार राज्यातील सर्व कॉलेजांमधील बीएफए (अप्लाइड आर्टस्, पेटिंग तसेच स्ल्पचर) अभ्यासक्रमाचे प्रवेश सीईटीद्वारे होणार आहेत. ही सीईटी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी विद्यापीठांनी कॉलेजचे संपूर्ण नाव, पत्ता, कॉलेज सुरू झाल्याचा दिनांक, प्रवेश क्षमता, अभ्यासक्रमासाठी एआयसीटीईची मान्यता घेतली आहे की नाही, याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण विभागाला त्वरित कळवायची आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षात प्रवेश प्रक्रियेत अनेक कॉलेज सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, विद्यापीठांनी त्यांच्या अखत्यारित येणाऱ्या कॉलेजांना नोटिसा पाठवून येत्या शैक्षणिक वर्षासाठी कॉलेजची संलग्नता रद्द का करण्यात येऊ नये, याबाबत विचारणा करण्याचे आदेश उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिले आहे.
आमदार मेधा कुलकर्णी आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभिषेक हरिदास यांनी संबंधित कॉलेजांनी ‘एआयसीटीईटी’ची मान्यता घेण्याबाबत तसेच प्रवेश प्रक्रिया योग्य होण्यासाठी पाठपुरावा केला होता.

राज्यात सरकारी कॉलेजांमध्ये बीएफए (अप्लाइड आर्टस्, पेटिंग तसेच स्ल्पचर) अभ्यासक्रमासाठी प्रवेश सीईटीद्वारे होतात. येत्या शैक्षणिक वर्षापासून एआयसीटीईची मान्यता घेतलेल्या सर्व कॉलेजांमधील या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ही सीईटीद्वारे होऊन विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत न्याय मिळेल. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टने नुकतीच एआयसीटीईची मान्यता घेतली असून, शासकीय चित्रकला कॉलेज (नागपूर आणि औरंगाबाद) व इतर खासगी कॉलेज मान्यता घेण्याच्या प्रक्रियेत आहे.
- राजीव मिश्रा, प्रभारी कला संचालक, कला संचालनालय