Higher Education

Higher Education

पुण्यात ‘स्किल हब’

PUBLISH DATE 6th December 2017

पुणे - राज्याची सांस्कृतिक, शैक्षणिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुण्यात लवकरच ‘स्किल हब’ तयार करण्यात येणार असून, तसा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविला जाणार आहे. घोले रस्त्यावरील शासकीय तांत्रिक विद्यालयाच्या परिसरात हे ‘स्किल हब’ उभारण्याचे प्रस्तावित आहे.

गेल्या काही वर्षांपासून शहराभोवती नवनवीन उद्योग येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर माहिती तंत्रज्ञान, विमानविद्या, हॉटेल उद्योग यांसारख्या नव्या उद्योग क्षेत्राला डोळ्यांसमोर ठेवून त्यांना आवश्‍यक कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी हे ‘स्किल हब’ विकसित केले जाणार आहे. पुणे जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक कंपन्या दाखल होत आहेत. त्याचबरोबर नवनवीन उद्योग येत असून, त्यांना मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळ लागणार आहे. ही गरज आणि संधी ओळखून ‘स्किल हब’च्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे.

औंध येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण (आयटीआय) संस्थेमध्ये सध्या जुन्या-नव्या अभ्यासक्रमांची सांगड घालून विद्यार्थी घडविण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे तेथे प्रवेश मिळविण्यासाठी गर्दी होत आहे. या पार्श्‍वभूमीवर आमदार विजय काळे यांनी बदलत्या काळानुरूप व नव्या उद्योगांच्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ घडविणारी संस्था म्हणजेच ‘स्किल हब’ तयार करण्याची संकल्पना मांडली आहे. याबाबतचा प्रस्तावही त्यांनी तयार केला असून, तो लवकरच राज्य सरकारला सादर केला जाणार आहे. ‘स्किल हब’मध्ये अद्ययावत दर्जाचे शिक्षण दिले जाईल. त्यासाठी जागा उपलब्ध असून, येथे अन्य सोयी-सुविधाही आहेत.

नव्या अभ्यासक्रमांची रचनाही तयार
विजय काळे म्हणाले, ‘‘घोले रस्त्यावरील शासकीय तांत्रिक विद्यालयाजवळ जागा उपलब्ध आहे. येथे ‘स्किल हब’ व्हावे, असा माझा प्रस्ताव आहे. पुण्यात येणाऱ्या नव्या उद्योगांसाठी आवश्‍यक कुशल मनुष्यबळ येथे घडविले जाणार असून, त्यादृष्टीने नव्या अभ्यासक्रमांची रचनादेखील केली जाणार आहे. विशेषतः पुण्याजवळ नवीन विमानतळ होत आहे, त्यामुळे विमानविद्येचे प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची गरज भासेल. अशा नव्या उद्योगांवर तयार केलेल्या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना ‘स्किल हब’द्वारे दिले जाईल.’’

घोले रस्ताच का? 
घोले रस्त्यावरील शासकीय तांत्रिक विद्यालयाजवळील जागा मध्यवर्ती आहे. याच ठिकाणी एक ‘वर्कशॉप’देखील आहे. या संस्थेमध्ये प्रशिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता किंवा जंगली महाराज रस्ता जवळ पडेल. या ठिकाणाहून पीएमपीएमएल बसथांबे, शिवाजीनगर बस स्थानक आणि रेल्वे स्थानकही जवळ आहे. त्याचा सर्वाधिक फायदा शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांना होईल.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

GET Free Educational Updates (Entrance Exam, Admissions, Jobs & many more...) Alerts on WhatsApp, Send message on 7720025900

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर. <नाव> <शहराचे नाव> <नोकरी>७७२०० २५९०० मेसेज व्हॉटस्अॅपवर पाठवा