Jobs

Jobs

गणित सांख्यिकी आणि संगणकशास्त्रासाठीच्या संधी

PUBLISH DATE 28th April 2020

गणित, सांख्यिकी, संगणक शास्त्र या मधील प्रशिक्षण घेतलेल्या मनुष्यबळाला या क्षेत्रात खूप वाव आहे.  

भविष्य नोकऱ्यांचे.

मागील दोन भागांत आपण माहिती संकलन, कार्यक्षेत्रप्रवीण व्यक्तींसोबत कृत्रिम प्रज्ञाधारित प्रश्न सोडविणे आणि तालीम संच तयार करण्याबाबत विवेचन केले. या पुढील महत्त्वाची पायरी म्हणजे संकलित माहितीचे विश्‍लेषण आणि त्याचा गणितीय किंवा सांख्यिकी प्रारूप बनविण्यासाठी वापर करणे हा होय. यासाठी लागणाऱ्या विद्या कौशल्यांचा आज आपण या लेखात विचार करूया. 

गणितीय प्रारूप बनविण्याआधी संकलित माहितीचे विश्‍लेषण करणे निकडीचे असते. असे विश्‍लेषण संकलित माहितीमधील विविध वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकते आणि या वैशिष्ट्यांचा शिक्क्यांसोबत काही संबंध आहे का ते ही यातून कळण्यास मदत होते. अशी वैशिष्ट्ये वापरल्यास आपणास अचूकपणे प्रारूप मांडण्यास मदत होते. माहिती विश्‍लेषणामध्ये सांख्यिकी तज्ज्ञ महत्त्वाची भूमिका बजावत असतात. एकदा का माहिती सारणीच्या स्वरूपात मांडली की त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे सांख्यिकी विश्‍लेषण करता येते. सुरुवातीला माहितीतील वेगवेगळ्या कंगोऱ्याचं चित्रबंध मांडून त्यातून माहिती वितरणाचा अंदाज बांधता येतो. स्तंभालेख (histogram), वितरणालेख (scatterplot) ही चित्रबंधाची काही उदाहरणे आहेत. वैशिष्ट्यांतील सहसंबंध (correlation),  वैशिष्ट्य मध्य (mean) आणि मार्गच्युती (deviation) आदींचा अभ्यास या अनुषंगाने करण्यात येतो.  संकलित माहितीचा अपुरा पुरवठा असेल तर बेज प्रमेयाधारित सांख्यिकी सूत्रांचा वापर करावा लागतो.   एकदा का हे विश्‍लेषण पार पडले की गणिती प्रारूप मांडण्यात येते. हे प्रारूप व्यवसानुरूप आहे की कसे हे तत्सम तज्ज्ञांकडून पडताळून घ्यावे लागते. या प्रारूपामधील घटकांची उकल करण्यासाठी तालीम संचांचा वापर केला जातो.  यासाठी अनुरूप अशा घट सूत्राचा (loss function) वापर केला जातो जे शिक्क्यांच्या प्रत्यक्ष आणि अंदाजित मूल्यावर अवलंबून असते. घट सूत्राची कमीत  कमी किंमत शोधण्यासाठी गणितीय पद्धतींचा वापर केला जातो. या सर्व कामामध्ये तज्ज्ञांची मदत लागते.  हा सर्व भाग संगणक आज्ञावलीच्या साह्याने पार पडला जातो. 

गणित, सांख्यिकी, संगणक शास्त्र या मधील प्रशिक्षण घेतलेल्या मनुष्यबळाला या क्षेत्रात खूप वाव आहे.  

ही कौशल्ये आत्मसात करण्यासाठी अनेक ऑनलाइन संपदा उपलब्ध आहे. यू-ट्युब, एनपीटेल (NPTEL) किंवा कोर्सेरा (Coursera) संकेत स्थळावर या संदर्भातील अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. हे विषय जगभरातील आणि भारतातील नावाजलेल्या विद्यापीठातील प्राध्यापकांनी शिकवलेले आहेत आणि ते घरबसल्या आपण सर्वांना महाजालामार्फत उपलब्ध आहेत. या सर्व कामासाठी पायथॉन या संगणक आज्ञावली भाषेचा वापर केला जातो. ही भाषा शिकण्यासाठीही मोफत संपदा ऑनलाइन उपलब्ध आहे.