Film Courses Admissions

Film Courses Admissions

आता पुणे विद्यापीठात करा चित्रपटांचाही अभ्यास

PUBLISH DATE 25th May 2018

 तुम्ही पदवीधर आहात?... तुम्हांला चित्रपट पाहायला, त्यावर बोलायला, त्याविषयी वाचायला आवडतं?... तुम्हाला चित्रपट या माध्यमाविषयी अधिक काही अभ्यासायला, जाणून घ्यायला आवडेल?... या सर्व प्रश्नांची उत्तरे 'हो' असतील, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात यंदा एक खूप चांगली संधी तुमची वाट पाहत आहे. संपूर्णपणे भारतीय चित्रपटांना आणि त्यासंबंधीच्या अभ्यासाला वाहिलेला एक नवा आणि स्वतंत्र अभ्यासक्रमच विद्यापीठात यंदाच्या वर्षापासून सुरू होत आहे. विशेष म्हणजे, विद्यापीठात पहिल्यांदाच होऊ पाहणाऱ्या या प्रयोगासाठी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाची (एनएफएआय) मोलाची साथ लाभली आहे.

विद्यापीठातील मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज या विभागातर्फे या वर्षापासून हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. भारतीय चित्रपटांचा अभ्यास करण्यासाठीचा हा पूर्ण वेळ अभ्यासक्रम एका वर्षाचा असून, त्याचे स्वरूप पदव्युत्तर पदविका (पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा) असे असेल. सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक अशा दुहेरी अभ्यासाचा त्यात अंतर्भाव असेल. त्याची प्रवेश प्रक्रियाही विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नुकतीच सुरू झाली आहे.

या अभ्यासक्रमाच्या निमित्ताने 'एनएफएआय'सारख्या सरकारी संस्थेनेही पहिल्यांदाच राज्यातील एखाद्या शिक्षणसंस्थेशी हातमिळवणी केली आहे. लवकरच या दोन्ही संस्थांत यासंबंधीचा एक औपचारिक स्वरूपाचा सामंजस्य करारदेखील केला जाणार आहे. समाजाचा अविभाज्य भाग असणाऱ्या चित्रपटाचा सखोल अभ्यास करणे हे समाजासाठी उपयुक्तच ठरणार असल्यामुळे हा अभ्यासक्रम सुरू केला जात असल्याचे मानले जात आहे.

'मटा'ने 'एनएफएआय'चे संचालक प्रकाश मगदूम यांच्याकडून या अभ्यासक्रमाविषयी अधिक माहिती जाणून घेतली. ते म्हणाले, 'चित्रपट संग्रहालायकडे देशातील हजारो चित्रपटांचा अमूल्य असा ठेवा आहे. अतिशय उपयुक्त असे ग्रंथालय आहे. सुसज्ज थिएटर आहे. या सुविधा विद्यार्थ्यांना चित्रपटांचा अभ्यास करण्यासाठी उपयोगात येऊ शकतील, या हेतूने गेली तीन वर्षे मी प्रयत्नात होतो. अशा स्वरूपाच्या एखाद्या अभ्यासक्रमाबाबत चर्चेसाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनाही मी भेटलो. त्यातूनच आलेल्या त्यांच्या सकारात्मक प्रतिसादानंतर यंदापासून हा अभ्यासक्रम सुरू होत आहे, याचा आनंदच आहे.'

जगात सर्वाधिक चित्रपट बनतात आणि बघितलेसुद्धा जातात, ते आपल्या देशात. लोकांच्या जीवनावर अतिशय मोठा परिणाम करणाऱ्या या चित्रपट माध्यमाचा, त्याच्या शक्यतांचा अभ्यास मात्र आपल्याकडे फारसा होत नाही. अशा विद्यापीठस्तरीय अभ्यासक्रमांच्या माध्यमातून त्या दिशेने आश्वासक वाटचाल सुरू होईल, असे मत अनेक अभ्यासकांनी या नव्या अभ्यासक्रमाविषयी व्यक्त केले.

असा असेल हा अभ्यासक्रम...

- एका वर्षात दोन सत्रांत विभागलेला अभ्यासक्रम. विविध शिष्यवृत्ती योजनांचा असेल अंतर्भाव. एकूण २५ विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेनंतर असेल प्रवेश

- चित्रपटांनी काय साध्य होते, ते कसे समजून घ्यावेत, त्यांचा रसास्वाद कसा घ्यावा याचा शास्त्रीय अंगाने अभ्यास करणे, हा त्याचा मुख्य उद्देश

- विद्यार्थ्यांना संशोधन प्रकल्पसुद्धा करावा लागणार. ऐच्छिक विषयसुद्धा निवडता येणार

- 'एनएफएआय'मध्ये जाऊन चित्रपट जतन करण्याचे तंत्रसुद्धा शिकायला मिळणार

- विविध भारतीय भाषांतील चित्रपट, त्यांतील नृत्य, संवाद, संगीत याचा सखोल अभ्यास. अनेक नामवंतांचे मार्गदर्शन मिळणार

- प्रवेश अट : कुणीही पदवीधर. शिकवण्याचे माध्यम : इंग्रजी. सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध.

म.टा पुणे

Click here Details of All  : Entrance Exams 2018

| Govt. & Private Jobs, Internships, Campus Drive, Off-campus & many more |

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)