Medical Admissions 2020-21

Medical Admissions 2020-21

मेडीकल प्रवेश: ३५३ विद्यार्थ्यांवर टांगती तलवार

PUBLISH DATE 16th August 2017

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वैद्यकीय शिक्षण व संशोधन परिषदेने (डीएमईआर) अनुसूचित जमातीसोबतच सर्व राखीव प्रवर्गातील जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे हमीपत्र देऊन मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची यादी शुक्रवारी जाहीर केली. राज्यातील ३५३ विद्यार्थ्यांनी हमीपत्राद्वारे राज्यातील विविध मेडिकल कॉलेजांमध्ये अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतला असून, आता या विद्यार्थ्यांवर प्रवेश रद्द होण्याची टांगती तलवार आहे. दरम्यान, प्रवेश प्रक्रियेत सहभागी झालेले मात्र, कॉलेज न मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी अद्याप डीएमईआरने जाहीर केलेली नाही.


जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे हमीपत्र देऊन राज्यातील मेडिकल कॉलेजांमध्ये मागासवर्गीय प्रवर्गातील आरक्षित जागांवर प्रवेश घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मंजुरी देण्याचा निर्णय दिला होता. त्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता डीएमईआरने हमीपत्राच्या आधारे एमबीबीएस, बीडीएस, बीएचएमएस, बीएएमएस आदी अभ्यासक्रमांसाठी मेडिकल कॉलेजांमध्ये प्रवेश घेणाऱ्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार ३५३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, त्यांचे प्रवेश रद्द होण्याची शक्यता आहे. तसेच, याचप्रकारे डीएमईआरला प्रवेश प्रक्रियेत हमीपत्राच्या आधारे राखीव प्रवर्गात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची यादी देखील प्रसिद्ध करावी लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयात या संपूर्ण प्रकारांबाबत येत्या १८ ऑगस्ट रोजी अंतिम सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीनंतरच विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत अंतिम निर्णय होणार आहे. डीएमईआरने संपूर्ण प्रकाराची माहिती विद्यार्थ्यांना कळवली आहे.


दरम्यान, राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाल्यानंतर संबंधित प्रवर्गातील विद्यार्थ्यांला गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देण्यात येईल. तसेच, हमीपत्राद्वारे गुणवत्ता यादीत समाविष्ट झालेल्या मात्र कॉलेज न मिळालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश हा सामान्य प्रवर्गात होणार आहे. या प्रकारामुळे डीएमईआरला सर्व राखीव प्रवर्गासोबतच सामान्य प्रवर्गासाठी नवीन प्रवेशाची गुणवत्ता यादी तयार करावी लागणार आहे. न्यायालयाचा अंतिम निर्णय १८ ऑगस्ट रोजी होणार असल्याने डीएमईआरने पुढच्या कार्यवाहीसाठी १९ ऑगस्ट तारीख निश्चित केली आहे. डीएमईआरने दुसरी प्रवेशाची गुणवत्ता यादी वेबसाइटवर जाहीर केली असून, विद्यार्थ्यांना १९ ऑगस्टपर्यंत मिळालेल्या कॉलेजांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे.